प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
अनिल मदने
जत
जत तालुक्यातील रेवनाळ येथील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेच्या रेवनाळ हायस्कूलमध्ये अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

अहिल्यामातेच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील ‘महाराष्ट्राच्या कर्तुत्वान महिला’हा चित्ररथ लक्षवेधी ठरला. मिरवणुकीत मुले- मुली, गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीनंतर रेवनाळचे लोकनियुक्त सरपंच धनाजी पाटील यांच्या हस्ते अहिल्यामातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि. प .सदस्य दिलीपराव वाघमोडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अहिल्यामातेचे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. देशामध्ये मोगलाई, ब्रिटिशशाही, पोर्तुगीजशाही होती. सर्वत्र स्वैराचार होता. त्या काळामध्ये इंदूर सारख्या बलाढ्य संस्थानांचा २९ वर्ष आदर्शवत असा राज्यकारभार केला. त्यांच्या राज्यकारभाराची दखल जागतिक इतिहासकारांनी घेतली. संपूर्ण प्रजा त्यांना माता मानत होती.
त्यावेळी माळरान शिक्षण संस्थेचे सचिव नितीन तोरवे व युवानेते राहुल बंडगर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती सांगत प्रभावी विचार मांडले. मुला- मुलींनी अहिल्यादेवींचे कार्य व शौर्य याविषयी भाषणे केली. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी मुला-मुलींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.तसेच पुण्यतिथीचे औचित्य साधून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी मारुती लोखंडे,अशोक हुलेनवर, बाजीराव वाघमोडे, जगन्नाथ वाघमोडे उपस्थित होते. तसेच विद्यालयातील शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.के.एस जाधव यांनी केले. तर जेष्ठ शिक्षिका सौ.एस.डी.वाघमोडे यांनी आभार मानले.



