आमदारांच्या आढावा बैठकीनंतरही कारभारात सुधारणा होत नाही हे दुर्दैव : विक्रम ढोणे
अनिल मदनेे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवरील को.बोबलाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे सोलापूर येथून कारभार करत आहेत. आठवड्यातून एक दिवस दर सोमवारी फक्त उपस्थित राहतात.हे विक्रम ढोणे यांनी आरोग्य केंद्राला भेट दिल्यानंतर समोर आले आहे. या गंभीर बाबीची लोकप्रतिनिधी,जिल्हा आरोग्य अधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या २९ जुलै रोजीच्या आढावा बैठकीत चर्चा होऊनही यांच्या कारभारात सुधारणा झाली नाही. तरीही प्रशासन या बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यास पाठीशी का घालत आहे ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
को.बोबलादच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या बेजबाबदारपणामुळे महाराष्ट्रातील सीमाभागातील जनतेला कर्नाटकमध्ये उपचारासाठी जावे लागते, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने लांच्छनास्पद आहे.
को.बोबलादपासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या विजापूर हायवेवरील तिगगुंडी फाट्यावरून या वैद्यकीय अधिकाऱ्यास येण्याजाण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर केला जातो.संबधित बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी यांना हटवण्याची ग्रामस्थांची मागणी केली आहे. लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते विक्रम ढोणे यांनी दिला आहे.



