अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जतपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटील मळा येथे वीज वाहिनीची मुख्य तार तुटून सुरू असलेल्या विद्युत प्रवाहास विजेचा धक्का बसून शाळकरी मुलासह युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.रोहित अजित पाटील (वय १६)व शिवाजी पांडुरंग म्हारनुर (वय २७) असे मयत झालेल्यांचे नावे आहेत.
जत येथील जत-घाडगेवाडी रोडवर अंबाबाई मंदिराच्या डोंगर परिसराच्या पायथ्याशी असलेल्या पाटील मळा येथे ही घटना घडली. पाटील मळा ते अंबिकानगर जाणाऱ्या अकरा के.व्ही.वीज वाहिनीची मुख्य वाहिनी तेथून जाते. पाटील मळा येथे उडीद पिकाची रास करीत असताना या दोघांच्या अंगावर वीज प्रवाह सुरू असलेली तार तुटून दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर रोहित यास वाचविण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आईसदेखील विजेचा धक्का लागून जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाचवेळी दोघांना शॉक लागून मृत्यू झाल्याने जत शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहित हा शाळकरी मुलगा असून दुसरा शिवाजी म्हारनुर हा शेती व्यवसाय करीत होता. त्यास पत्नी, दोन मुले, आई – वडील असा परिवार आहे.



